Wednesday, August 11, 2010

श्रावण

|| श्री ||

आषाढ संपून, श्रावणाची चाहूल लागली की मनात राहून राहून रेंगाळतात बाल कवींच्या ओळी...

श्रावण मासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरुनी उन पडे....

निसर्ग जसा उल्हासित होतो आणि आपल्या हिरव्या रंगांची उधळण करतो तशीच सण आणि उत्सवांची सुद्धा उधळण सुरु होते...

बाबा नेहमी म्हणायचे की एकदा श्रावण सुरु झाला की वर्ष कसे सरते त्याचा पत्ताच लागत नाही!!!
खरच आहे ते, एकदा श्रावण सुरु झाला की एका मागून एक सण सुरूच होतात.. माझ्या बाबांना पाच भाऊ आणि चार बहिणी त्यामुळे घर एकदमच भरलेले, रोजचे जेवणच तीन पंगतीत व्हायचे, तर मग विचार करा सणाची काय सरबराई असेल ते!!! घरी सण म्हटले की एक वेगळीच लगबग असायची.. आई आणि काकी हिरव्या साड्या नेसून पूजा करायच्या, ताई आत्या, आमची सर्वात मोठी आत्या, जिचे लग्न झाले नव्हते. ती आणि घरच्या सर्व स्त्रिया छान छान स्वयंपाक करायच्या.

प्रत्येक दिवसाचा थाट ठरलेला असायचा... म्हणून तर श्रावणी सोमवारी वरण, भात, कवला (कौल्याची पाने मिळतात त्याचा चिंच घालून केलेला रस्सा) तूप, बदामाची पोळी, पातवड (अळूवडी), सांबारे, मेथे(अळूच्या देठापासून नारळाचे दुध घालून केले जाते) चटणी, मीठ, काकडी ह्या सर्व गोष्टी केळीच्या पानावर भोवताली रांगोळी काढून जर जेवलो नाहीत तर तो श्रावणी सोमवार आमच्या घरी होणारच नाही... ह्या सर्व संस्कारातून मोठे झाले असल्याने आम्ही जेव्हा अंधेरीला राहायला आलो तरी ह्या चाली रिती चालूच राहिल्या ... आणि जशी आजी आम्हाला प्रत्येक सणांच्या गोष्टी सांगायची त्या प्रमाणे बाबा प्रत्येक सणाचा त्यांचा अनुभव सांगायचे...

अंधेरीला राहायला आलो तरी श्रावणी सोमवार तो श्रावणी सोमवार... मी नेहेमी प्रमाणे केळीची पाने घेत होते, रांगोळी काढत होते एकूण काय तर जेवणाची तयारी करत होते, आमच्या शेजारी दिवेकरांचे कुटुंब रहायाचे, त्यांचा मुलगा गौतम (माझ्या मैत्रिणीचा-रेश्मा धाकटा भाऊ) नेहेमी घरी यायचा. आम्ही जरी flat मध्ये राहत असलो तरी संपूर्ण building आमच्या साठी घर होते, त्यामुळे कोणीही कधीही कोणाच्याही घरी असायचे, त्यामुळे आम्हा मुलांना शोधायचे म्हणजे आम्हाला जोर जोराने हाका मारण्या शिवाय दुसरे गत्यंतर नव्हते...

तसाच नेहमी प्रमाणे गौतम श्रावणी सोमवारी घरी बसला होता, त्याने ही सगळी श्रावणी सोमवारची तयारी बघितली आणि विचारले आज तुमच्या घरी काय आहे. मी त्याला सांगितले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की त्याला पण केळीच्या पानावर जेवायाचे होते. मी त्याला विचारल्यावर तो धावतच घरी गेला आणि विचारण्यात वेळ न घालवता सरळ सांगून पळतच परत आला आणि थेट पानावरच बसला... आणि त्या नंतर किती तरी वर्ष तो आमच्या कडे श्रावणी सोमवारच्या पंगतीत सामिलच झाला.... त्याला ते इतक आवडल की जेव्हा तो Australia ला उच्च शिक्षणासाठी गेला, त्याला आई ने विचारला तुला कुठे जेवायला आवडेल तेव्हा त्याने आईला विचारले, काकी तुम्ही मला ते पानावर जेवतो तसा करून देवू शकता का? आणि आई ने तेवडा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक केला आणि केळीची पानं पण काहीतरी करून मिळवली...

एकदा अशाच एका श्रावणी सोमवारी गौतम तर होताच पण, Fancy पण होती. आत्ता Fancy कोण? हा एक मोठ्ठाच प्रश्न आहे. मी जेव्हा गोव्याला job साठी गेले होते तेव्हा मला एक मैत्रीण- वंदना भेटली, आत्ता अस वाटते की तिला आणि तिच्या सर्व कुटुंबियांनाच भेटायला देवाने गोव्याला पाठवले होते. असे काही लोक असतात ज्याच्याशी भेटताच जन्मो जन्मीचे ऋणानुबंध जोडले जातात. तसच काहीसा ह्या Thomas कुटुंबाशी झाल, तर Fancy ही ह्या मैत्रिणीची बहिण पण नंतर ह्या दोघींनी मला नसलेल्या बहिणींची जागा भरून काढली...

असो तर Fancy पण श्रावणी सोमवारी जेवायला होती, आणि सोमवारचा उपवास सोडला की केळीचे पान एका बाजूने फाडायची रीत आहे, तसं मी सवयी प्रमाणे फाडलं , तर Fancy ने विचारले हे काय केलं? तर मी सांगितल की अस करायची पद्धत आहे, तर तिला ते खरा वाटेना, मग तिने हे खर आहे हे पडताळायाला आईला विचारले तर आईने दुजोरा दिला, त्या मुळे तिला ते पटले, पण गौतमने ह्याच दुजोरयाचा फायदा उचलला आणि तिला चेहऱ्यावर कसलाही भाव न आणता म्हणाला, ते केळीच्या पानाची व्यवस्थित घडी घाल, आणि fridge मध्ये ठेव कारण पुढल्या सोमवारी ह्या पानावरच जेवायचे आहे, तो हे इतक्या आत्मविश्वासाने बोलला, की आईबाबा पण एक क्षण गप्प झाले, आणि Fancy पण पुन्हा आई कडे खात्री साठी पाहू लागली, पण ह्या वेळेला आईने पण गौतमच्या मस्करीत भाग घेतला होता आणि गप्पच बसली!!! आणि बाबा तर शांतपणे जेवतच राहिले जसं काही झालाच नाही... पण मला काही फार वेळ गप्प बसता आले आणि मी जे हसायला लागले आणि तिला कळले की गौतम तिची मस्करी करतो आहे!!!

पण जेव्हा जेव्हा श्रावणी शनिवार यायचा बाबांना राहून राहून एक प्रसंग पुन्हा पुन्हा आठवायचा...
बाबा LIC मध्ये कामाला होते आणि रोज घरून जेवणाचा डबा डबेवाला आणायचा, आणि एका शुक्रवारी त्यांच्या डब्याची अदलाबदली झाली, कोणाचा तरी डबा आमच्या घरी डबेवाल्याने दिला आणि बाबांचा डबा त्यांच्या घरी. शनिवारी बाबांना अर्धा दिवस असायचा म्हणून बाबांनी जेवायला डबा काही उघडलाच नाही आणि ह्या वेळेला मात्र डबेवाल्याने बाबांचा डबा बरोबर घरी दिला होता, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्या घरच्या माउलीने तो डबा उपवासाचे जेवण भरून पाठवला होता!!!

तिने विचार केला असणार, हा ज्याचा डबा आहे जर मी रिकामा पाठवला तर तो बिचारा आज office मध्ये उपाशीच राहील, आणि आज श्रावणी शनिवार आहे म्हणजे बाहेरचे सुद्धा काहीही खाता येणार नाही, म्हणून कोणी एक जण उपाशी राहु नये ह्या एका विचाराने त्या माउलीने तो भरून पाठवला होता, पण आमच्या घरून मात्र हा विचार झाला नाही आणि तो डब्बा आमच्या घरून मात्र रिकामाच गेला.... बाबांना राहून राहून वाटायाचे की त्या घरच्या बायकोने, आईने, बहिणीने हा केवढा मोठ्ठा विचार केला होता व अन्नपूर्णेच्या सढळ हाताने तो डब्बा भरून पाठवला होता...

आज मी त्या अन्नपूर्णेला शतश: प्रणाम करते... हे कुटुंब तुमच्या एका श्रावणी शनिवारच्या उपवासाच्या जेवणाचे कोटी कोटी ऋणी आहे.... आणि हे ऋण कधीही न फेडण्या सारखे आहे... फक्त देवाकडे एकाच प्रार्थना करू शकते की ह्या अन्नपुर्णेला आणि तिच्या कुटुंबाला कधीही एकपण घास कमी नको पडू देऊस.....

Wednesday, August 4, 2010

स्मृत्याकुल

Nostalgic किवा nostaligia  ह्या नावाचा bolgspot हवा होता, पण तो आधीच book झाला असल्याने, मी मराठीत nostalgia ला काय बोलतात हे शोधायला सुरुवात केली, आठवणी नाही तर स्मुर्ती हे शब्द सुचले पण ते nostalgia शब्दाचा जो काही परिणाम आहे तो सापडत नव्हता, nostalgia चा अनुभव येत नव्हता.

मग एकाच उपाय उरला तो म्हणजे net वर काही मिळते का... मग एक site मिळाली त्यावर इंग्लिश into मराठी शब्दकोश मिळाला आणि त्यांनी केलेले translation होते "स्मृत्याकुलता" किवा स्मृत्याकुल म्हणून मग blog चे नाव "स्मृत्याकुल"



"स्मृत्याकुल" हा blog फक्त काही आठवणींच्या गल्ली  बोळ्यातून फेरफटका आहे.  ज्या त्या त्या वेळेला खूप येतात आणि आता माझे बाबा नसल्याने त्या लिहिल्या तर जास्त ताज्या राहतील, म्हणून हा अट्टाहास "स्मृत्याकुल" बस आणि काहीच नाही....